सावित्रीबाई फुले
ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एक समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणूनही त्यांना ओळखले जाते. महिला शिक्षणात तसेच महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.तसेच त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी असे देखील मानले जाते. या सर्व कार्यात त्यांना त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे साथ लाभली. इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्र शासनाकडून ३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून दरवर्षी १९५५ पासून साजरा केला जातो.
जन्म :
सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १९४० साली त्यांचे ज्योतीराव फुले यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय नऊवर्षे तर ज्योतीरावांचे वय तेरा वर्षे होते.
शिक्षण :
लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या.ज्योतीरावांनी सावित्रीबाईना घरीच शिक्षण दिले. नंतर त्या सातवीपर्यंत स्कॉटिश मिशनरी शाळेत शिकल्या. पुढील शिक्षणासाठी ज्योतीरावांनी त्यांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भावलकर यांना सावित्रीबाईंना शिकवण्याची जबाबदारी सोपवली.
शाळा :
ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. मनुवादी समाजाला न जुमानता त्यांनी लग्नानंतर शिक्षण घेतले आणि पहिल्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका बनून गरीब मुलींना शिक्षण दिले. केवळ चार वर्षात त्यांनी १८ शाळा उघडल्या आणि त्या चालवल्या सुद्धा. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या. पण १८४८ साल संपेपर्यंत मुलींची संख्या ४० ते ४५ पर्यंत पोहोचली. मनुवादी लोकांनी त्या वेळी या शाळेचे स्वागत धर्म बुडाला…. जग बुडणार…असा केला. काही लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकले, तर काहींनी त्यांच्या अंगावर हात टाकण्याची भाषा केली पण सावित्रीबाईंनी आपले काम चालू ठेवले.
समाजकार्य :
शिक्षणाबरोबर सावित्रीबाई फुले यांनी समाजातील काही क्रूर प्रथाही बंद केल्या. बाल विवाह प्रथेमुळे काही मुली बाराव्या-तेराव्या वर्षी विधवा होत. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पती निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागत किंवा त्यांचे केशवपन करून कुरूप बनवले जात. त्यांनी या प्रथेला विरोध केला तसेच या विरुद्ध नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला. तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे सुद्धा समर्थन केले.
मृत्यू :
इ.स. १८९६-९७ या वर्षी पुण्यात प्लेग ची साथ आली. या साथीत अनेक लोकांचा बळी गेला. हा रोग संसर्गजन्य असल्याने ब्रिटीश सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर वेगळे काढण्याचे फर्मान काढले. आजारी माणसाला ब्रिटीश शासन व्यवस्थित पाहत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. रुग्णांची हेळसांड थांबावी म्हणून सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या डॉक्टर मुलगा यशवंत याला सोबत घेवून पुण्यात ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरु केला. प्लेगच्या रोग्यांची सेवा करता करता सावित्रीबाईंना सुद्धा प्लेग या रोगाने जखडले आणि त्यातच त्यांचा १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
साहित्य :
सावित्रीबाई फुले या लेखिका तसेच कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी १८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले.
इतर
- पुणे महानगरपालिकेने १९८३ मध्ये त्यांचे स्मारक तयार केले.
- १० मार्च १९९८ रोजी भारतीय टपाल विभागाने फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
- ३ जानेवारी हा दरवषी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
- २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
- २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कन्नड भाषेत चित्रपट तयार करण्यात आला.
आणखी वाचा :