माझा डीएड प्रवेश
माझा डीएड प्रवेश
जून २००६ ला माझा बारावीचा निकाल लागला ७४.३३ गुणांन मी बारावी पास झालो. आणि मग वेध लागले ते डीएड करून मास्तर व्हायचे .निकालाच्या दुसऱ्याच दिवशी डीएड प्रवेशाची जाहिरात लागली.आणि प्रवेश फॉम घेण्यासाठी मी बीड गाठले.कन्या शाळेत सदर फॉर्म ची विक्री सुरु होती.
त्या काळी डीएड म्हणजे खूपच प्रतिष्ठेचा कोर्स होता. फॉर्म घ्यायला खूपच प्रचंड गर्दी होती.सकाळी सात वाजता गेलेलो मी दुपारी तीन च्या सुमारास मला फॉर्म मिळाला.सकाळपासूनचा सर्व आलेला सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला. एका झाडाखाली बसून सर्व फॉर्म भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सबमिट केला आणि घरी आलो.
दररोज सकाळी मी आमच्या फाट्यावर पेपर वाचायला जायचो. तशी मला पेपर वाचायची सवय नव्हती पण डीएड प्रवेशाचा “कटऑफ” पेपर मध्ये येणार म्हणून मी नित्यनियमाने दररोज पेपर चाळायचो. पेपरच्या प्रत्येक पान न पान मी पाहायचो कि कोठे डीएड विषयी काही आले का म्हणून. त्या वेळी आमच्याकडे एक गाय होती खिलार जातीची. त्या गाईला मी दररोज चरायला न्यायचो म्हणजे पेपर वाचायचा झाला कि माझ्यामागे दिवसभर गाय चारायचे काम असायचे. सोबत मित्र पण असायचे ते पण त्यांचे गुरे घेऊन यायचे. उन्हाळा असल्याने आम्ही गुरांना मोकळे सोडून द्यायचो आणि एखाद्या झाडाखाली मस्त रम्मी ( पत्ते ) खेळायचो.(त्या वेळी गावात पत्त्याच्या डावामागे बसून बर्यापैकी रम्मी खेळायची शिकलो होतो असो.)
आणि तो दिवस उजाडला डीएड ची पहिली विभागीय (औरंगाबाद) यादी लागली. कट ऑफ होता ४६० गुण आणि मला होते ४४०. थोडा नाराजच झालो पण हि तर पहिली यादी आहे ‘दुसरीत नक्कीच नंबर लागेल’ या आशेवर मनाचे समाधान केले आणि पुन्हा एकदा कट ऑफ यादीची वाट पाहू लागलो. १५ ते २० दिवसांनी केंद्रीय (पुणे) यादी लागली.कट ऑफ होता ४३६ ! कट ऑफ पाहून इतका आनंद झाला कि त्या दिवशी मी चक्क पेपरच विकत घेतला. ( पेपरवाला सुद्धा चकित झाला असावा कारण मी दररोज त्याच्याच शेजारी असणाऱ्या न्हाव्याच्या दुकानात रोज पेपर वाचत असायचो.)
घरात सगळ्यांना आनंद झाला होता. मी पुण्याला जायची तयारी केली.माहितीपुस्तीकेत खाजगी कॉलेजची फिस वाचून बरोबर १५००० रु (एकाकडून उसने) घेतले होते. मुक्कामाची सोय नसल्याने रात्रीच्या गाडीने प्रवास करायचा ठरवला.सकाळी ४ वाजता मी व वडील पुण्यात पोचलो.आयुष्यात पहिल्यांदाच पुणे शहर पाहत होतो.त्या आधी सर्वात मोठ शहर बीड पाहिलं होत.
पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकावर प्रात:विधी उरकून आणि हातपाय धुऊन “सुतार अध्यापक विद्यालयाकडे निघालो.(त्यावेळी डीएडचे प्रवेश सुतार अध्यापक विद्यालयाला होत असत.) पुणे नवीन असल्याने आणि पत्ता माहित नसल्याने आंम्ही रिक्षाने जाण्याचे ठरवले. रिक्षावाल्याने आम्हाला बराच वेळ गोल गोल फिरवून एकदाचा सुतार अध्यापक विद्यालयाला आणून सोडले. २०० भाडे घेऊन तो निघून गेला बराच वेळ प्रवास केल्याने आम्हीही पैसे दिले.( रिक्षावाल्याचा धूर्तपणा परत येताना कळला कारण येताना इतरांबरोबर आम्ही पीएमटी ने आलो तिकीट फक्त ७रु.)
आमच्या आधी बरीच भावी शिक्षक तेथे आलेली होती.प्रत्यक्ष प्रवेश 10.30 ला सुरु झाले. जसजसे माईकवर कटऑफ पुकारत तसतशी माझी छाती जोरजोरात धडधडत होती. ४६० वरून खाली येत येत मेरीट ४४२ वर येऊन थांबले आणि पुन्हा एकदा पदरी निराशा आली. नकळत डोळ्यात पाणी आले. निराश मनाने गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकावर आलो.
उतरलेला चेहरा पाहून आई सर्व समजून गेली. चार पाच दिवस नैराश्यात गेल्यानंतर मी पुन्हा एकदा “कटऑफ” ची वाट पाहू लागलो. कालांतराने औरंगाबाद आणि पुण्याच्या याद्या लागल्या. पुन्हा एकदा निराशाच पदरी पडली. दोन्ही यादीत माझा नंबर लागला नाही, डीएड करण्याच्या नादात बीएस्सी ला प्रवेश घ्यायचा राहून गेला होता.
कारखान्याचे (ऊसतोडीचे) दिवस जवळ आले होते. घरचे मी लहान होतो तेव्हापासून ऊसतोडीला जात होते. डिएड ला नंबर लागला नाही आणि बीएस्सीला पण प्रवेश घेतला नाही,एक वर्ष वाया जाणार म्हणून मी ऊसतोडीला जायचा निर्णय घेतला.
माझा अर्धा आणि घरचा एक असे दीड कोयत्याची ‘उचल’ (पैसे) घेतली आणि कोल्हापूरला ऊसतोडणीला गेलो. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मी कारखान्याला जायचो त्यामुळे कामाचा जास्त त्रास झाला नाही.पण बारावी झाल्यावर उसच तोडायला जायचं होत तर कशाला शिकलो हा प्रश्न मला राहून राहून सतवायचा.
उसतोडणीला आलो त्याला महिना होत आला होता एक दिवस पाऊस झाल्याने कामाला सुट्टी होती.पेपर वाचायची इच्छा झाली म्हणून गावात जाऊन पेपर घेऊन आलो.योगायोग म्हणा किंवा माझ नशीब म्हणा त्या दिवशी पेपरला कोल्हापूरची डीएड प्रवेशाची तिसरी यादी लागली होती.
कोल्हापूर विभागाची तिसरी यादी लागली याचा अर्थ औरंगाबाद आणि पुण्याची पण तिसरी यादी लागेल म्हणून मी काम अर्ध्यात सोडून घरी आलो.आठ दिवसांनी औरंगाबादची तिसरी यादी लागली अपयशाच्या ‘गजकर्णाने’ इथेही पिच्छा सोडला नाही पुन्हा एकदा निराशा. अपयशाची सवयच आता झाली होती म्हणून आणखी एक अपयश (पुण्याची तिसरी यादी) पदरी पाडून घेण्यासाठी मी घरीच थांबलो.
एक महिन्यांनातर पुण्याची तिसरी यादी लागली कट ऑफ पाहून मी आनंदाने उडिच मारली,कारण कटऑफ होता 430 च्या खाली ! आणि मला होते 440. पुन्हा एकदा पुण्याला जायची तयारी सुरू केली. एकदा पुण्याला जाऊन आल्यामुळे (वडिलांसोबत) या वेळी एकटाच जायचे ठरवले. महितीपुस्तिकेचा चांगला अभ्यास केल्याने शासकीय कॉलेज मिळणे कठीण होते त्यामुळे खाजगी कॉलेजची फिस 12000 हजार रुपये एकाकडून व्याजाने घेतले तसेच इतर खर्च (टिकीट,प्रवास,जेवण ई.) म्हणून 2000 रू. घेतले.सोबत एक रेडीओ घेतला(रेडिओ ऐकण्याची खुप आवड होती म्हणून उचल च्या पैशातून 150 रू चा छोटा रेडीओ घेतला होता) आणि निघालो पुण्याच्या वाटेला.
पहाटे तीन च्या सुमारास मी पुण्याला पोहोचलो. राञी खिशातील पैशांनी मला झोपू दिले नव्हते म्हणून डोळे जळजळ करत होते. तोंडावर थोडे पाणी मारून मी रेडिओ बाहेर काढला आणि गाणे ऐकू लागलो.जसजसा दिवस उजडू लागला तसतसे बसस्थानकावर गर्दी वाढू लागली.बहुतांश डीएड प्रवेशासाठी आलेली मुलंमुली होती(त्याच्या बोलण्यातून कळत होतं) सात वाजत आले होते. एव्हाना एका मुलाबरोबर मैत्री झाली होती त्याच्या जवळून थोडे कोलगेट घेतले दात घासून तोंड धुवून मी बिना आंघोळीचा एकदम अंघोळ केल्यासारखा दिसु लागलो.चहा घेतला आणि मग आम्ही (तो मित्र आणि त्याचे वडील) सुतार अध्यापक विद्यालय (डीएड चे प्रवेश तेथे होणार होते) या ठिकाणी पीएमटी ने पोहोचलो.
पुन्हा एकदा तेच चित्र. माईकवर येणारा कटऑफ चा आवाज आणि त्या आवाजाकडे कानात प्राण आणून ऐकणारे भावी शिक्षक. हळूहळू कटऑफ खाली येत होता तसतसी माझी छाती धडधडत होती. कटऑफ ४४० वर आला आणि छातीतील धडधड थांबली आता आपला प्रवेश नक्की होणार असं वाटून मनात आनंदाचे कारंजे उडू लागले. पण माझा प्रवेश सहजासहजी होऊ द्यायचा नाही हे त्या विधात्याने जणू ठरवूनच घेतले होतेकी काय, कारण माईकवर आवाज आला की शेवटच्या फक्त दोन जागा शिल्लक आहेत. 440 गुण असणारे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी आत बोलावून घेतलं आम्ही सगळे मिळून अकरा जन होतो. दोन जागा आणि अकरा उमेदवार ! पुन्हा एकदा छातीत धडधड सुरु झाली होती.आम्ही सगळे एकमेकांचे चेहरे पाहत होतो.प्रत्येकाचा चेहरा एका अनामिक भीतीने मलूल झाला होता.ते दोन नशीबवान कोण ? आणि नऊ कमनशीबी कोण ? हे येणारे पुढील दहा मिनीटे ठरवणार होते.
प्रवेश प्रक्रीया राबवणारे आधिकारी आम्हांला सांगत होते,” शेवटच्या फक्त दोन जागा शिल्लक आहेत आणि तुम्ही अकरा जण आहात याचाच अर्थ तुमच्यातील नऊ जणांचे प्रवेश होणार नाही.प्रवेश मिळाला नाही म्हणजे सर्व काही संपले असं मुळीच नाही असं बरच काही बाही ते सांगत होते.
समान गुण असल्याने आम्हाला काही निकष लावण्यात आले. त्यामध्ये दहावीत सर्वात जास्त गुण असणार्यांना प्राधान्य, जर दहावीत समान गुण असेल तर ज्याचे वय जास्त त्याला प्राधान्य वगैरे निकष त्यांनी लावले.दहावीच्या गुणानुसार माझा दुसरा नंबर आला आणि माझा जीव भांड्यात पडला. माझ्या नंतरचे नऊ जणातील काही तिथेच रडू लागले. त्यांचे पालक त्यांना समजावून हाॅलच्या बाहेर घेवून गेले.
आम्हा सर्वांना गुणानुक्रमे बसवले गेले आणि एक फाॅम भरण्यासाठी दिला. फाॅम भरून दिल्यावर प्रत्येकाला रिक्त जागानुसार जिल्हा-तालुका-काॅलेज एलसीडीवर दाखवण्यात आले.मला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील “कै.सौ.अरूणादेवी अध्यापक विद्यालय” भेटले. माझ्या हातात डीडीचा फाॅम टेकवून हा तेरा हजार पाचशे (काॅलेजची फीस) “डीडी”(डिमांड ड्राफ्ट) आधी काढुन आणा आणि मग प्रवेशपञ घेवून जा असं तिथल्या आधिकारी यांनी सांगितले.
मी तो डीडी घेवून बाहेर पडलो. त्यावेळी “डीडी” म्हणजे काय आहे हेच कळत नव्हतं. मग तो काढायचा कसा ? कुठे जायचे ? हे पुढचे प्रश्न मला पडलेच नाहीत. खरेतर खेड्यापाड्यातील मुले मागे राहण्याचे कारण म्हणजे त्यांनी बाहेरचे जग पाहिलेलेच नसते. मग बॅंक,चेक,डीडी ही तर लांबची गोष्ट !
एक युक्ती सुचली. डीडी तर सर्वांना काढायचा होता.मी माझ्या समोर प्रवेशाच्या वेळी असणार्या मुलीला तिच्या वडीलांसह पाहीले. थोडी चेहरा ओळख झाल्यामुळे मी सरळ त्यांच्या मागोमाग निघालो.ओ काका, “माझा पण डीएड ला नंबर लागला आहे” मला पण येऊ द्या की तुमच्याबरोबर. त्यांच्याबरोबर डीडी काढला,प्रवेश केंद्रात दिला नि लागलीच अकलूज ची बस पकडण्यासाठी स्वारगेट बसस्थानक गाठले.
vurcazkircazpatliycaz.5D1ZOSxL8YDU
empolders xyandanxvurulmus.ed3q2GV4Hq9D
hi