Marathwada मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),जालना,बीड,धाराशिव (उस्मानाबाद),नांदेड,परभणी,आणि हिंगोली जिल्हे मिळून मराठवाडा प्रदेश बनतो.)
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. जो दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस कारवाई करून मराठवाड्याला निजामांच्या ताब्यातून मुक्त करून स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले. या दिवशी संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यात,शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येते.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पाश्वभूमी :
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाला.पण त्यावेळी संपूर्ण भारत देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळी एकूण 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने भारतात विलीन झाली. पण हैद्राबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर संस्थान आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने मात्र भारतात विलीन झाली नाहीत.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली यांचे राज्य होते.हैद्राबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम वंशाचे राज्य होते. स्वामी रामानंद्तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थान मुक्त करण्यासाठी आणि भारतात विलीन करण्यासाठी मुक्तीसंग्राम लढा चालू झाला होता.
हैद्राबाद संस्थानाची त्यावेळी लोकसंख्या 1 कोटी 60 लाख इतकी होती. यात तेलंगाना, मराठवाडा, आणि कर्नाटकाचा काही भाग यांचा समावेश होता.
कासीम रझवी :
मराठवाडा मुक्तीसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकार या संघटनेच्या माध्यमातून विरोध करणाऱ्या लोकांना आणि तेथील जनतेवर अमर्याद अत्याचार करण्यास सुरुवात केली. निजाम शासनाचे हे अत्याचार इतके अमर्याद होते कि हैद्राबाद मुक्तीसंग्राम मधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हाती शस्त्रे हा घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधी यांना सुद्धा संमती दिली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, राविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशपायन, शंकरसिंग नाईक, बाबासाहेब परांजपे, विजेयान्द्र काबरा या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
लढ्याचा विस्तार :
मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढा लढला गेला.यात जीवाची काळजी न करता अनेक स्वातंत्रवीर पुढे आले. मराठवाड्यात निजामांच्या पंतप्रधानास थांबवण्यासाठी पूल उडवून देणारे काशिनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्र जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबादचे होतीकर गुरुजी, तसेच परभणीत रझाकारांना हुसकून लावणारे सूर्यभान पवार, नांदेड येथील देवराव कवळेआदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य लढा लढला गेला.
ऑपरेशन पोलो
निजाम शासनाचे अत्याचार एवढे अमर्याद होते कि शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम शासनाच्या विरोधात पोलीस कारवाईची घोषणा केली. 11 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निजाम संस्थानावर कारवाई सुरु झाली. एक एक करत भारतीय सैनिकांनी निजामाच्या ताब्यातील जिल्हे मुक्त करायला सुरुवात केली आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जनरल अल इद्रीस याने शरणागती पत्करली. निजामाने पराभव मान्य केला आणि हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाला.
हे सुद्धा पहा :