जीन्स पॅन्ट

जीन्स पॅन्ट

मी आठवीला शिकत होतो त्यावेळेची ही गोष्ट आहे. आमच्या घराची परिस्थिती जेमतेम म्हणण्यापेक्षा हलाकीची होती हे म्हणणे अधिक उचित ठरेल. आई वडील ऊस तोडणीसाठी परगावी जायचे, बहुदा कोल्हापूर कडे, आणि मला व माझ्या मोठ्या भावाला घरी ठेवायचे शिक्षणासाठी. जो पर्यंत मोठा भाऊ माझ्या सोबत होता ( पाचवी पर्यंत ) तो पर्यंत ना मला कामाचा तान होता, ना बाजाराचा, ना भाकरी थापण्याचा. मी फक्त हात पंपावरून पाणी आणायचो आणि भांडी घासायचो बाकी सर्व काम अण्णा ( मी माझ्या मोठ्या भावाला अण्णा म्हणायचो ) करायचा.

पहिली ते पाचवी पर्यंतचे दिवस मजेत गेले. पण अण्णा थोडा मोठा झाल्यामुळे आई वडिलांनी त्यालाही ऊस तोडणीसाठी सोबत घेऊन गेले आणि पाचवीपासून मी घरी एकटाच राहू लागलो. सकाळी लवकर उठून जेवण बनवणे, सर्व कामे उरकून शाळेत जाणे यामुळे माझी खूपच तारांबळ उडत असे. आई वडील वर्षातील सहा महिने घरी तर सहा महिने ऊस तोडणीला असत. घरी असताना मला काही एक काम करावे लागत नसे, पण तोडीला गेल्यावर मात्र मलाच सर्व कामे करावी लागत असे.

कसेतरी दोन तीन वर्षे निघून गेली मी आता आठवीला आलो होतो.बऱ्याच गोष्टी कळू लागल्या होत्या. एक दिवस आमच्या वर्गातील एका मुलाचा वाढदिवस होता. त्याने छानपैकी ड्रेस घातला होता. कोट सदृश शर्ट आणि निळी जीन्स पॅन्ट. त्यावेळी मी पहिल्यांदा जीन्स पॅन्ट बघत होतो. आमच्या सर्व मुलांचा ड्रेस म्हणजे खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट या व्यतिरिक्त दिवाळीला कधीतरी घेतलेला रंगीत ड्रेस. पण त्या दिवशी मात्र फक्त आणि फक्त त्या मुलाच्या जीन्स पॅन्टचीच जास्त चर्चा होती.

त्या मुलाची जीन्स पॅन्ट पाहिल्यापासून मला ती विकत घ्यायचं वेड मला लागलं. आपणही जीन्स पॅन्ट विकत घ्यावी आणि शाळेत मस्त शायनिंग मारावी असे वाटू लागले. शुक्रवारी आमचा आठवडी बाजार असायचा आणि शाळेला दुपारून सुट्टी असायची. शाळा सुटल्यावर मी तडक बाजारात गेलो, सरळ कपड्याच्या दुकानाकडे वळलो. बाजार तसा मोठा नसल्याने कपड्याची फक्त एकच दुकान होती. दुकानदाराला सरळ जीन्स पॅन्ट दाखवा म्हणालो. दुकानदाराने थोडावेळ माझ्याकडे पहिले आणि नकारात्मक मान हलवली.(खेड्यापाड्यात त्या वेळी जीन्स पॅन्ट वापरत नव्हते म्हणून बाजारात त्या मिळत नसाव्यात.)

जीन्स पॅन्ट तर विकत घ्यायचीच असा मी ठाम निर्धार केला आणि तालुक्याच्या (गेवराई ) बाजाराला जायचा निश्चय केला.

बुधवारी गेवराईचा आठवडी बाजार असायचा,  ( आत्तासुद्धा असतो) आमच्या तांड्यातील बरेच लोक बाजाराला जायचे. मी एका शेजारच्या म्हातारीबरोबर बसने गेवराईला पोहोचलो. मी पहिल्यांदाच तालुक्याच्या गावात आलो होतो, आमच्या इथे एखादी मोटारसायकल दिसायची पण शहरात तर एकामागोमाग एक मोटारसायकल धावत होत्या, गावाकडे दिवसातून तीन वेळा दिसणारी बस, इथे माञ खुप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होत्या. कार, रिक्षा,टेम्पो विविध प्रकारची वाहने मी पहिल्यांदाच पाहत होतो.

बसस्थानकावरून सरळ मी त्या म्हातारीबरोबर बाजारात दाखल झालो, ईतकी गर्दी, इतका गोंगाट मी पहिल्यांदाच पाहत होतो.पूर्ण तालुक्यातील लोक बाजारात आले होते म्हणून एवढी गर्दी असावी. बाजारात पोचताच मी म्हातारीला कपड्यांच्या दुकानात जाऊ म्हटलं तर तीने आधी बाजार करू आणि शेवटी जाऊ असे सांगितले. चोहीकडे भाजीपाल्यांचा खच पडला होता. मेथी आणि पालक यापलीकडे  कधी न गेलेलो मी आज प्रथमच इतक्या प्रकारच्या भाज्या पाहत होतो. एका भाजीसाठी पाच दुकाने हिंडणाऱ्या म्हातारीचा मला मात्र आता प्रचंड राग आला होता. शेवटी एकदाचा बाजार झाल्यावर आम्ही कपड्यांच्या दुकानाकडे वळालो.

रंगीबेरंगी कपड्यांच्या दुकानांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.आकर्षक, रंगीबेरंगी कपडे काहींनी वर लटकवलेले होते.तर काहींनी पुतळ्यालाच कपडे घातले होते. एका दुकानात मला जीन्स पॅन्ट दिसली आणि मी ती घेण्याचा पक्का निर्धार केला माझ्या मापाची पॅन्ट पसंत केली आणि किंमत विचारली. किंमत एकूण मी एकदम गारच पडलो. माझ्या खिशात जेमतेम १००रुपयेच होते आणि पॅन्टची  किंमत होती ४०० रुपये. माझा पडलेला चेहरा पाहून म्हातारीने ओळखले कि माझा खिसा खूपच अशक्त आहे. तिने मला थेट बाजाराच्या कोपऱ्यात नेले, बरीच दुकाने होती तिथे – कपड्यांची,घरगुती साहित्यांची,चपलांची,बुटांची,आणि इतर. तिथल्या सर्व वस्तू अतिशय स्वस्त  होत्या. आम्ही कपड्याच्या दुकानात पोहचलो आणि मी माझी जीन्स पॅन्ट पसंत केली जास्त दिवस घालता यावी म्हणून मुद्दाम थोडी उंचीत जास्त घेतली किंमत विचारल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण याआधी मी जी पॅन्ट पाहिली होती तिची किंमत ४०० रुपये होती आणि या पॅन्टची किंमत फक्त ३० रुपये होती. (नंतर मला लक्षात आले तो कोपऱ्यात भरणारा कपड्यांचा बाजार हा हरमाल बाजार होता, जिथे बहुदा गरीब लोकांना परवडेल या किमतीत थोड्याफार जुन्या वस्तू विकल्या जायच्या.) थोडी जुनी वाटत होती पण ती मला पसंत पडली आणि मी तिला ३० रुपयांना विकत घेतली.

कधी एकदा मी ती जीन्स पॅन्ट घालतो आणि शाळेत जाऊन शायनिंग मारतो असे मला सारखे वाटत होते. सकाळपासून मी पाणीसुद्धा पिलो नव्हतो.जीन्सकडे पाहून माझी तहानभूक कुठल्याकुठे पळून गेली होती. संध्याकाळची बस पकडून आम्ही घरी आलो. त्या रात्री मला झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त अंघोळ करून नवीकोरी (थोडीशी जुनी) जीन्स पॅन्ट घालून मी शाळेत गेलो आणि पुढील १५ ते २० दिवस न धुता सलग ती जीन्स पॅन्ट घालून मी  मस्त शायनिंग मारत हिंडत होतो.

 

आणखी वाचामाझा डीएड प्रवेश 

By rpcgurueducation.com

HI I AM TEACHER AND I PROVIED SOME EDUCATIONAL INFORMATION

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *